जायकवाडी धरणात साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ
कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांची माहिती
जायकवाडी धरणात साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ
– कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात आज चौथ्या दिवशी देखील पाण्याची आवक सुरूच राहिल्याने धरणाच्या पाणी पातळीत चार दिवसांत साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. आज पाऊस झाल्याने बुधवारी धरणाच्या पाण्यात वाढ होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी केला आहे.
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वात २८८ उमेदवार देणार
जायकवाडीतील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाची वैधता
टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्यात क्रांती येईल
जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल २०८ किलोमीटर आहे. या धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल ४०० गावांची तहानही भागवली जाते. या धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असे समजले जाते. सध्या या धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. यामुळे पाणी पातळीत संथगतीने वाढ होताना दिसत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घसरण
जायकवाडीमध्ये पाण्याची आवक सुुरू झाली आहे. मागील वर्षी याचदरम्यान जायकवाडीमध्ये मोठा साठा होता. मात्र त्या तुलनेत यंदा मोठी घसरण यात झाल्याचे दिसत आहे. यामुळेच यंदा जानेवारी-फेब्रुवारीद दरम्यान पाणीटंचाईचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र परिसरात अद्याप समाधानकारक असा पाऊस झाला नाही.
५ हजार ३३६ क्युसेक आवक सुरू
जायकवाडी धरणात आज ५ हजार ३३६ क्युसेक आवक सुरू असल्याने पाणी साठा ७.५३ टक्के झाला असून मागील वर्षी याच दिवशी ३०.९३ टक्के पाणी साठा होता. सध्या गोदावरी नदीच्या पात्रात दारणा-५३९८, भावली- २९०, कडवा-४००, नांदूर-मधमेश्वर-३५५९ पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीत सुरू आहे.