टेंभुर्णी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक करण्याची मागणी
भरधाव वाहतुकीचा जनसामान्यांना धोका
माढा (महेंद्र सोनवणे) : तालुक्यातील टेंभुर्णी शहरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतुक चालक शहरातील अंतर्गत रस्त्याचा आधार घेऊन मार्ग काढताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून जाणारी शाळकरी मुले, वयोवृध्द यांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. याला आळा बसविण्यासाठी शहरा अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा लावली जाणारी वाहने यामुळे या रस्त्यावर पुरेसा रस्ता उपलब्ध नसतानाही भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने शाळकरी मुले व वृद्धांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.