छत्रपती पुतळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची निदर्शने
-सत्तेची चव चाखणारांच्या आंदोलनामुळे आश्चर्य
छत्रपती पुतळ्याप्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शने
-सत्तेची चव चाखणारांच्या आंदोलनामुळे आश्चर्य
छत्रपती संभाजीनगर : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथील क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मूक आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदवला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूणार्कृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी एका कार्यक्रमात पार पडले होते. मात्र हा पुतळा २६ आॅगस्ट रोजी दुपारी अचानक कोसळला. यामुळे संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध केला जात आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात सत्तेची चव चाखत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नेहमी मोर्चे व आंदोलन केले जात आहेत. सुरूवातीला बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर आता शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मात्र सत्तेत असलेले पक्ष ही याप्रकरणी आंदोलन करीत असल्याने आश्चर्य व्यकत केले जात आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी संभाजीनगर येथील क्रांती चौकात मूक आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्यासह विविध महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
दोषींवर कठोर कारवाई करा
यावेळी आंदोलकांकडून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. या कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. याविषयी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील म्हणाले की, राज्यात या घटनेमुळे सर्वत्र संताप आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आहे. मात्र या घटनेचा राजकारण केले जात आहे.