मुख्यमंत्री यांच्या कृतज्ञता सोहळ्याची आंबेडकरी समाजाकडून घोषणा

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून सत्कार सोहळ्यावर टीका

0

मुख्यमंत्री यांच्या कृतज्ञता सोहळ्याची आंबेडकरी समाजाकडून घोषणा

-रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून सत्कार सोहळ्यावर टीका

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बुद्धविहार, विपश्यना केंद्र, पुतळ्यांच्या पुनर्निमार्णासाठी भरघोस निधी दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कृतज्ञता सोहळा होत आहे. यासाठी आंबेडकरी समाजातर्फे ११ आॅगस्टला टीव्ही सेंटरच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. यासंदर्भात आंबेडकरी समजाच्या वरिष्ठांनी कार्यक्रमाची घोषणा केली, पण रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने या सत्कार सोहळ्यावर टीका केली आहे.

या कृतज्ञता सोहळ्याला गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी प्रदीप जैस्वाल यांचाही सत्कार केला जाणार आहे. आंबेडकरी युवक, विद्यार्थ्यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना भेटून निवेदन द्यावे, आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू, असे आवाहन विजय मगरे, संतोष भिंगारे, विजय जोंधळे यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार स्मारके, महापुरुषांचे पुतळे अन काही मूठभर लोकांना उद्योजक बनवल्याची जाहिरात करीत आहे. त्याऐवजी सामाजिक न्यायाच्या निधीला कायद्याचे संरक्षण द्या, आम्हीही कृतज्ञता व्यक्त करू, असे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम म्हणाले.

यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजक जालिंदर शेंडगे म्हणाले की, आम्ही हा सत्कार चांगल्या हेतूने करत आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांनी अजिंठा लेण्यांच्या पायथ्याला ५० कोटींचे बुद्धविहार होत आहे. तिथेच विपश्यना केंद्र असेल. या प्रकल्पात बाबासाहेब आणि तथागताची मूर्ती असेल. जागतिक दर्जाचे हे भीमपार्क होईल. विहारांना १२० कोटी रुपये दिलेत. तरीही आम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठेही वळवता येणार नाही, असा कायदा करण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरू, असे सांगितले.

शिंदेंचा सत्कार करणे योग्य नाही

महा-डीबीटी प्रणालीचा घोळ घालून शिष्यवृत्ती योजनेत दलित विद्यार्थ्यांची शिक्षणात मुस्कटदाबी केली. बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न आहे. रमाई घरकुल योजना, दलित वस्ती सुधार योजनांतील निधीची पळवापळवी केली असताना मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करणे योग्य नाही. त्यापेक्षा आंबेडकरी समजाने नेहमीप्रमाणे सत्तापक्षासोबत संघर्ष केला पाहिजे, असे आंबेडकरी युवक कुणाल भालेराव म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.