संभाजीनगरात सिग्नल, आस्थापना आणि कार्यक्रमांमध्ये भीक मागण्यास मनाई

- शहर पोलिसांकडून तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल

0

संभाजीनगरात सिग्नल, आस्थापना आणि कार्यक्रमांमध्ये भीक मागण्यास मनाई

– शहर पोलिसांकडून तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चौकात सिग्नल लागताच थांबलेल्या वाहनचालकांकडून बळजबरी पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर शहर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. यामध्ये सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात ५ आणि ६ आॅगस्टला चार तृतीयपंथींना ताब्यात घेऊन जिन्सी ठाण्यात चार आणि सिडको ठाण्यात दोन तृतीय पंथीयांवर गुन्हे दाखल केले होते. हा प्रकार थांबत नसल्याने रस्त्यावर, सिग्नलवर किंवा आस्थापना, घरे, कार्यक्रम आदी ठिकाणी जाऊन भीक मागण्यास मनाई केली असून हे आदेश ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर या काळासाठी लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथींयाविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतरही हा प्रकार थांबत नसल्याने अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढील ६० दिवसांसाठी तृतीयपंथी किंवा गटाने भीक मागणाऱ्यांना रस्त्यावर, सिग्नलवर किंवा आस्थापना, घरे, कार्यक्रम आदी ठिकाणी जाऊन भीक मागण्यास मनाई केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

शहरातील बाबा पेट्रोल पंप, सिडको चौक, मुकुंदवाडी चौक, केम्ब्रिज चौक याशिवाय इतर ठिकाणी सिग्नल लागताच तृतीयपंथी वाहनाजवळ जाऊन पैशांची मागणी करतात. समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तरी त्याला बळजबरी पैसे मागतात. यामध्ये चारचाकीवाल्यांना तर ते अक्षरश: रडकुंडीला आणतात. हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उपायुक्त नवीनत काँवत यांनी अशा भिक्षेकर्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर जिन्सी पोलिसांनी सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली चार तृतीयपंथीयांना पकडले होते. तसेच सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी सिडको चौकात कारवाई करत तेथे दोन तृतीयपंथीयांना पैसे घेताना पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याविरुद्ध मुंबई भीक मागण्यास मनाई कायदा कलम ४ अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कारवाई करूनही त्यांच्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसले नाही.

आदेशाचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई

तृतीयपंथींना ट्राफिक जंक्शन, चौकात, रस्त्यावर एकट्याने किंवा समूहाने एकत्र येण्यास आणि वाहनचालकांकडून, प्रवाशांकडून भीक मागण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर या काळासाठी लागू करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तृतीयपंथीयांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करू नये

उपद्रव किंवा जनतेला धोका होण्यापासून रोखण्यासाठी कलम १६३. भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात भीक मागणारे, विशेष करून तृतीयपंथी यांना एकट्याने किंवा एकत्रितपणे शहरात फिरण्यास आणि निवासस्थान, आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्यांना कोणीही जन्म, मृत्यू, उत्सव, लग्न आदी कार्यक्रमासाठी आमंत्रित करू नये असेही आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.