लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्यांचं काय?

- मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला सवाल

0

लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्यांचं काय?

– मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला सवाल

बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रर्वगात समावेश करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये दौरे करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यात तांदळ गावात त्यांनी भेट दिली असून यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. चांगली योजना आहे. तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा, कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत. पण तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्यांचं काय? त्यांच्या आरक्षणाचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्यांचं काय?: यावेळी जरांगे म्हणाले, मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली. मात्र मी डाव टाकला आणि २९ तारखेला होणारी बैठक पुढे ढकलल्यामुळे फडणवीस यांचा डाव हुकला. राज्यात फडणवीस यांनी वातावरण गढूळ केले आहे. मी मॅनेज होणार नाही त्यामुळे माझ्याविरोधात डाव रचला जात आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा गनिमी कावा आहे. पण मी यांचा कार्यक्रम लावतो. आता आखाडा जवळ आला आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. यावेळेस या निवडणुकीत यांना पाणी पाजुन यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे. यांना खुर्ची भेटू द्यायची नाही म्हणत त्यांनी हे सरकार मराठा समाजाच्या मुळावर उठल्याचे सांगितले.

लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका

हैदराबाद येथे साडेतीन हजार कुणबी नोंदीचे पुरावे सापडले असतानाही फडणवीस इकडे आणू देत नाहीत. फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे. आमची लेकरं जेलमध्ये घातल आहेत, रेकॉर्ड शोधणे बंद आहे. हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत आहे. ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. हे सगळं जनतेच्या हातात आहे. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका. यांचा करेक्ट कार्यक्रम करा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिला.

आनंदाच्या शिध्यात दिलेल तेल अर्धा गॅस संपला तरी ते पिवळं होत नाही

-आनंदाचा शिधावरून जरांगेंनी काढले सरकारचे वाभाडे

जालना : सरकारला शेतकऱ्यांचा काय त्रास होतो ते आम्हाला माहीत नाही. त्यामुळेच आम्ही आता शेतकऱ्यांच्या व आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणार आहोत. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधातील वस्तूवर भाष्य करीत सरकारचे वाभाडे काढले. यावेळी ते म्हणाले की, सरकारने गोरगरिबांची कामे करावीत. आनंदाच्या शिधामधील पिशवीतील तेल कढईत टाकले तर अर्धा गॅस संपला तरी ते पिवळं होत नाही, असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या व आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणार आहोत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाई दिली नाही तर आगामी विधानसभेत सरकारच्या विरोधात मतदान करणार आणि सरकारला वाजवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे सांगत त्यांनी कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली. मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्राशिवाय सुटी नाही, असे जरांगे म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार अशोक चव्हाण जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. त्यावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, आमच्यात खूप जण मध्यस्थी करतात. अनेकांची नावे सुद्धा माझ्या लक्षात नाहीत. सागर बंगल्याची पायरी चढली की हे मध्यस्थ वाट चुकतात. त्यांनी मध्यस्थी केली काय नाही केली काय, आमचे तर देवेंद्र फडणवीस यांनी वाटोळे केले आहेच, असे जरांगे पाटील म्हणाले.

५ सप्टेंबरला गेवराईत घोंगडी बैठक

आंतरवाली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आगामी विधानसभेत उमेदवार द्यायचे किंवा पाडायचे यासंदर्भात २९ सप्टेंबर रोजी समाजाच्या बैठकीत हा निर्णय होणार होता. मात्र काही कारणामुळे ही बैठक पुढे ढकलली. आता समाजाला विचारुन पुढील तारीख देता येईल. तत्पूर्वी मी ५ सप्टेंबरपासून गेवराई येथून घोंगडी बैठकीला सुरुवात करतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.