बीड विधानसभेसाठी महायुतीतील धुसफुस
– तिकीटसाठी शिंदेगट व अजित पवार गटात रस्सीखेच
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध राज्यातील सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच महायुतीतील धुसफुस समोर आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत कोणाला तिकीट मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.
बीड विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाच्या अनिल जगतापांनी दावा केल्यानंतर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी देखील याच विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीत आत्तापासूनच जागावाटपावरुन सस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.
पेच सोडवण्याचे मोठे आव्हान
बीड विधानसभेची जागा १९९० पासून युतीतून शिवसेनेकडे आहे. आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडून दावा केला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे वर्चस्व या जागेवर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून बीड विधानसभेवर धावा केला जातोय. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हा पेच सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.