ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांची भाजपमधून हकालपट्टी
ठेवीदारांकडून किरीट सोमय्या यांना विचारलेल्या प्रश्नानंतर भाजपची कारवाई
ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांची भाजपमधून हकालपट्टी
-ठेवीदारांकडून किरीट सोमय्या यांना विचारलेल्या प्रश्नानंतर भाजपची कारवाई
बीड : प्रतिनिधी ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळविण्यासाठी यासाठी आंदोलन करीत आहेत. यामुळे सुरेश कुटेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते अजूनपर्यंत भाजपमध्ये असल्याने एका ठेवीदाराने थेट माजी खासदार किरीट सोमय्या यांना फोन आमच्या ठेवी कधी मिळतील, असे विचारले. यावर सोमय्यांनी तुमची एक दमडीही मिळणार नाही, मी खोटे आश्वासन देत नाही, असे सांगून हात झटकले. त्यानंतर मात्र दुसºयाच दिवशी भाजकडून कुटेची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र जाहीर करण्यात आले.
ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेतील ठेवीदारांचे ५२ शाखांमध्ये ३,७५० कोटी रुपये अडकले आहेत. हे पैसे परत मिळावेत यासाठी ठेवीदार वेळोवळी आंदोलन करीत आहेत. यातील एका ठेवीदाराने भाजप नेते सोमय्या यांना फोन करून रक्कमेसंदर्भात जाब विचारला असता सोमय्या यांनी ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यावेळी सोमय्यांनीच संबंधित ठेवीदाराला फोन करून ही कारवाई केल्याचे सांगत हकालपट्टीचे पत्रही पाठवले.
संभाजीनगर येथे राहणारे उमेश कुलकर्णी यांनी देगलूर येथील प्लॉट विकून ज्ञानराधात पैसे ठेवले होते. त्यातून मिळणाºया व्याजावर ते आपला घरखर्च चालवत होते. पण या सोसायटीने पैसे थकवल्याने गेल्या वर्षभरापासून ते याविषयी लढा देत आहेत. संभाजीनगरात ज्ञानराधाच्या ३ शाखांत ५ हजारहून अधिक ठेवीदार आहेत. यामुळे त्यांनी कुलकर्णी यांनी सोमय्यांना फोन केला होता. मागील वर्षी सुरेश कुटे यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांनंतर ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे अडकले, याविषयी ठेवीदार उमेश कुलकर्णी यांनी किरीट सोमय्यांना कोंडीत पकडल्यामुळे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे बाब मांडत २४ तासांत सुरेश कुटे यांच्या हकालपट्टीचे पत्र काढले.
तुम्हाला दमडीही मिळणार नाही : सोमय्या
ज्ञानराधा प्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याचा तपास सुरू आहे. यामुळे ठेवीदारांना मी खोटे बोलणार नाही. ठेवीदारांचे पैसे परत मिळणे फार अवघड आहे. आतापर्यंत अनेक पतसंस्था, चिटफंड कंपन्या बुडाल्या. २० वर्षे झाली तरी लोकांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला दमडीही मिळणार नाही. मी तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही, असे सोमय्या कुलकर्णींना फोनवर म्हणाले.