पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू
-परिसरात वाळूची अवैध साठवणूक
सिल्लोड : तालुक्यातील तांडा बाजार परिसरात पूर्णा नदी पात्रात सध्या वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तरी अनेक ठिकाणी अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू आहे. याकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. वाळू माफियांनी पूर्णा नदी पात्रात अनेक ठिकाणी वाळू उपसा करीत परिसरात वाळूची अवैध साठवणूक करून ठेवली आहे.
तालुक्यातील वडोद बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले तांडा बाजार, गव्हाली, तलवाडा, निल्लोड, कायगाव मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरांचे व हायवाचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले आहेत. अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही. गाव- खेड्यांमधून भरधाव धावणाºया ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास चालक मुजोरीची भाषा वापरतात. पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली तर आम्ही हप्ते देतो, असेही चालक सांगतात.
कार्यवाही करण्यात येईल
घटनास्थळी जाऊन पाहणी करतो. काही आढळून आल्यास चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार हारुण शेख यांनी दिली.
कारवाई करण्याची मागणी
वाळू तस्करी सुरू असताना महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. वेळीच वाळू माफियांवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी तांडा बाजार परिसरातील नागरिकांकडून होत आहे.