चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार
-भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नियुक्ती
चिकलठाणा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार
-भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संपादन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. सिडको, महापालिका आणि महसूल या विभागांनी संयुक्त मोजणीदेखील केली असून लवकरच प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९,३०० फूट आहे. विस्तारीकरणानंतर या विमानतळाची धावपट्टी १२ हजार फुटांची होईल. त्यानंतर विमानतळावर कार्गो विमाने तसेच जास्त प्रवासी क्षमता असलेल्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होणार आहे. या विमानतळावर विमानांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी समांतर टॅक्सी-वे असणार आहे. या धावपट्टीच्या विस्तारासह हा टॅक्सी-वे पूर्ण होणार आहे.
या विमानतळाच्या भूसंपादनासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य विमानतळ प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून या विभागाची नियुक्ती केली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राज्य सरकारने ६८ कोटी रुपयांचा निधी महसूल प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात बुधवार रोजी खा. डॉ. कराड यांनी सर्व संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. या वेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह मनपाचे अधिकारी, भूसंपादन कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
इमिग्रेशन चेक पोस्टला मान्यता
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रात्री येणाºया विमानांच्या पार्किंगची व्यवस्था चिकलठाणा विमानतळावर सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. भागवत कराड यांनी यापूर्वी केली होती. त्यासाठी भूसंपादन आणि विस्तारीकरणाचे काम आवश्यक आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने इमिग्रेशन चेक पोस्टला मान्यता दिली असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या सुविधेने फायदा होईल.