मांजरा धरण अजूनपर्यंत मृत साठ्यातच

जीवंत साठ्यात येण्यासाठी १ दलघमी पाण्याची आवश्यकता, मांजरा धरण सध्या मृत साठ्यातच असल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ

0

मांजरा धरण अजूनपर्यंत मृत साठ्यातच
-जीवंत साठ्यात येण्यासाठी १ दलघमी पाण्याची आवश्यकता

केज : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला. त्यात यंदा पाऊस चांगला असला तरी मांजरा धरण सध्या मृत साठ्यातच असल्याने येणाºया काळात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. मांजरा धरणावरील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्येच पाणी नसल्यामुळे धरणात पाण्याची आवक ही ०.२५ दलघमी एवढीच आहे. मागील तीन वर्षांत जुलै महिन्यामध्ये मांजरा धरण जीवंत पाणी साठ्यात होते. परंतु यावर्षी जुलै महिन्यात अद्यापही धरण मृतसाठ्यात असल्याने या मृतसाठ्यातून जीवंत साठ्यात येण्यासाठी या धरणात १ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या धनेगाव येथे मांजरा नदीवर मांजरा धरण आहे. या धरणाला धनेगाव धरण या नावानेही ओळखले जाते. या धरणातून लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह या मोठ्या शहरांतसह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भूम, पाटोदा, महासांगवी, केज, मांजरसुबा या भागात चांगला पाऊस झाला तर धरणात पाण्याची मोठी आवक होते. मात्र यंदा वेळेवर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली होती. परंतु ज्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्याप्रमाणात मांजरा धरणात पाण्याची आवक कमी असल्याने धरणसाठा मृत साठ्यात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात आतापर्यंत ४४३ मि.मी. पाऊस पडला आहे. १ जून पासून ते आतापर्यंत ५ दलघमी पाण्याची आवक धरणात झाली आहे. सध्या मांजरा धरण हे मृत साठ्यात असून ४६.२६५ दलघमी पाण्यातून लातूर शहरासह बीड जिल्ह्यातील मोठ्या शहरांना पाणी पुरवठा केला जात आहे.
५ दलघमी पाण्याची आवक
सध्या मांजरा धरण हे मृत साठ्यात असून सध्या पाणी हा ४६.२६५ दलघमी पाणी आहे. ०.२५ ची आवक होत आहे. १ जूनपासून आतापर्यंत ५ दलघमी पाण्याची आवक झाली असून धरण जीवंत साठ्यात येण्यासाठी अद्यापही १ दलघमी पाण्याची आवक आवश्यक आहे, असे सहायक अभियंता अभिजीत नीतनवरे म्हणाले.
मागील वर्षीही अत्यल्प साठा
वर्ष-२०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांमध्ये जुलै महिन्यात मांजरा धरणात जीवंत पाणीसाठा होता. तर आॅक्टोबर-२०२२ मध्ये मांजरा धरण १०० टक्के भरले होते. परंतु मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.