जरांगे फॅक्टरमुळे पाटोद्याच्या नेतृत्वाला यंदा संधी मिळण्याची अपेक्षा

- जरांगे फॅक्टरमुळे कोणाला फटका बसणार याची चर्चा सुरू

0

पाटोद्याच्या नेतृत्वाला यंदा संधी मिळण्याची अपेक्षा

– जरांगे फॅक्टरमुळे कोणाला फटका बसणार याची चर्चा सुरू

पाटोदा : प्रतिनिधी
विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासुन या मतदार संघात एक वेळा ४६ वर्षांपूर्वी तेही २ वर्षांच्या संधीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी आष्टीच्याच नेत्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले. या सर्व नेत्यांना विजयी करण्यात पाटोदेकरांनी नेहमीच सिंहाचा वाटा उचलला असला तरीही आत्तापर्यंत पाटोदेकरांना आमदारकीची संधी मिळालेली नाही. या मतदार संघातील राजकीय परिस्थिती बदलली असून या परिस्थितीत पाटोद्याच्या नेतृत्वाला यंदा संधी मिळेल आशा असली तरी या मतदार संघात जरांगे फॅक्टरमुळे कोणाचा पराजय होईल हे सांगणे सध्या कठीण झाले असल्याने सध्या याच फॅक्टरची चर्चा जोर धरू लागली आहे.

आष्टी, पाटोदा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून एकदाच तेही १९७८ ते ८० अशी केवळ दोन वर्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय दिवंगत नेते लक्ष्मणराव जाधव हे पुलोदचे आमदार झाले होते. त्यापुर्वी व त्यानंतरही सातत्याने आष्टीच्याच नेत्यांचे वर्चस्व कायम राहीले. भीमराव धोंडे यांनी पुर्वी ४ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. १९९५ मध्ये येथुन आष्टीचेच अपक्ष साहेबराव दरेकर यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत पाटोद्याचे रामकृष्ण बांगर यांनी समाजवादी पक्षाकडून सायकलवर नशीब आजमावले मात्र त्यांना यश आले नाही. सध्या कडा येथील रोहन थोरवे यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक असताना व बहुतांशी आष्टीचे असताना आता पाटोद्याला संधी मिळते का याकडे लक्ष असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टर म्हत्वाचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील निवडणुकीत आजबे यांचे नशीब बलवत्तर ठरले परंतु आता येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतील निवडणुकीचे वातावरण बघता या मतदारसंघात देखील जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती कशी राहते याचा अंदाज राजकीय जाणकारांना देखील लावणे कठीण झाले आहे.

अ‍ॅड. नरसिंह जाधव प्रयत्नशील

२०१९ च्या निवडणुकीत कुरघोडीच्य राजकारणात बाळासाहेब आजबे यांची लॉटरी लागली. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पाटोद्याचे अ‍ॅड. नरसिंह जाधव हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. ते सध्या मतदारसंघात फिरुन नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.