नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी सॉफ्ट लोन देण्याचे आठ वेळा आश्वासन
-मनपाला पत्र न दिल्याने आश्वासनाच्या गप्प असल्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपाला ८२२ कोटींचा स्वहिस्सा भरायचा आहे. त्यासाठी शासन सॉफ्ट लोन देणार, असे राज्यातील मंत्र्यांनी जवळपास आठ वेळा सांगितले आहे. रविवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कृतज्ञता सत्कार सोहळ्यात हा निधी देणार असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. मात्र अद्यापपर्यंत चार ओळींचे पत्र देखील सरकारने मनपाला दिले नसल्याने या केवळ आश्वासनाच्या गप्प असल्याचे बोलले जात आहे.
या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी २,७४० कोटींमध्ये राज्य शासन, केंद्र शासन आणि मनपाचा हिस्सा आहे. आतापर्यंत केंद्र आणि राज्याचा निधी आला आहे. मात्र मनपाचे ८२२ कोटी अद्याप मिळालेले नाहीत. आतापर्यंत मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण यांनीदेखील हा निधी शासन देणार असल्याचे जाहीर केले. मागच्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले गेले. मात्र मनपाला याबाबत अद्याप पत्र मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.
नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी सॉफ्ट लोन:
टीव्ही सेंटर येथील आंबेडकरवादी जनतेने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता सोहळ्यापासून आमदार संजय शिरसाट हे दूरच असल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले आहे. यावेळी अब्दुल सत्तार, अतुल सावे, संदिपान भुमरे हे मुख्यमंत्री शिंदेंचे स्वागत करण्यासाठी विमानतळात गेले. शिरसाट मात्र बाहेर उभा राहूनच साडेतीन तास मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते. कार्यक्रमस्थळीदेखील त्यांचे फोटो नव्हते, यामुळे शिरसाटांच्या मनात नेमक काय असा प्रश्न उपस्थितांकडून विचारला जात आहे.
डीपीमध्ये बदल करण्याचे आश्वासन
नवीन विकास आराखड्यात घरांवर असलेली रस्त्यांची आरक्षणे कायम ठेवली आहेत. त्यामुळे आपले घर पाडले जाईल, अशी नागरिकांना भीती आहे. मात्र, आमचे सरकार हे घर देणारे आहे, बेघर करणारे नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीपीमध्ये बदल करण्याचे आश्वासन या वेळी दिले.
पत्र घेऊन येणार
नव्या पाणीपुरवठा मनपाचा ८२२ कोटींचा हिस्सा देण्याचे ठरले आहे. यासाठी पुढच्या आठवड्यात त्याचे पत्र घेऊन येणार आहे, असे खासदार संदिपान भुमरे म्हणाले.