आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

-२८७ पदे रिक्त असताना केवळ २१३ उमेदवारच उत्तीर्ण

0

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

-२८७ पदे रिक्त असताना केवळ २१३ उमेदवारच उत्तीर्ण

बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या एएनएम या परिचारिका संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, २८७ पदे रिक्त असताना केवळ २१३ उमेदवारच यासाठीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे भरती होऊनही पदे रिक्त राहणार आहेत. आता उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्र पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत दररोज ५० उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे.

एएनएम परिचारिका ही गाव पातळी, आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर आरोग्य सुविधा पोहोचवणारी महत्त्वाची घटक असते. लसीकरण मोहीम, विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत एएनएम परिचारिकांचे योगदान शेवटच्या घटकापर्यंत असते. मात्र याच परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर व उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत होता. काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने पद भरती प्रक्रिया सुरू केली होती.

जिल्ह्यातील २८७ पदे यातून भरणार होती. यासाठीची निवड प्रक्रियेचे काम शासनाने आयबीपीएस या कंपनीला दिले होते. पात्र होण्यासाठी ९० टक्के गुणांसह उत्तीर्ण होण्याची अट होती. यामुळे आयबीपीएसने घेतलेल्या परीक्षेत केवळ २१३ परिचारिका उत्तीर्ण होऊ शकल्या आहेत. त्यामुळे अद्यापही ७४ जागा रिक्त राहणार आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. उल्हास गंडाळ म्हणाले की, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या मदतीला २ सहायक देण्यात आले आहेत. सुमारे सहा ते सात टेबलवर एकाच वेळी पडताळणी प्रक्रिया होत आहे.

३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार

२१३ उमेदवारांची आता कागदपत्र पडताळणी सुरू केली आहे. यात रोज ५० जणांना बोलावले गेले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.