सर्वोच्च न्यायाधीशांच्या पाटणा येथील घरी चोरी
-पाटलीपुत्र पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल
पाटणा : येथील पाटलीपुत्र पोलीस स्टेशन परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या घरात सोमवारी रात्री उशिरा चोरट्यांनी चोरी केली. ही चोरी होत असताना न्यायाधीश आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत होते.
न्यायाधीशांच्या पाटणा येथील पाटलीपुत्र कॉलनीतील घर क्रमांक १३३ मध्ये ही घटना घडली. निवासस्थानी घराची देखरेख करण्यासाठी एक रक्षक होता. मात्र चोरीच्या वेळी मुस्तकीम हा त्याच्या घरी गेला होता. दुसºया दिवशी सकाळी केअरटेकर न्यायाधीशांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांना चोरीची माहिती मिळाली. न्यायाधीशांचे हे वैयक्तिक निवासस्थान आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच पाटलीपुत्र पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांनी मोठ्या खटल्याची सुनावणी केली. नीट पेपर लीकचे एक प्रकरणदेखील आहे, ज्यामध्ये त्यांनी सुट्टीतील खंडपीठासमोर सुनावणी केली. ४ दिवसांपूर्वी हजारीबागमध्ये नीट पेपर लीक प्रकरणात पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी केलेल्या तपासादरम्यान सीबीआयने कटकमदग येथील गेस्ट हाऊस सील केले होते. कारण याठिकाणी तीन दिवस लोकांच्या हालचालीचे पुरावे सापडले होते. यामुळे दिल्ली आणि पाटणा येथील सीबीआयच्या पथकाने हजारीबाग गाठून तपास केला.
सीसीटीव्हीच्या फुटेजनंतर चोरटयांची ओळख पटली
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी चोरीची माहिती मिळाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घरात कोणी नसल्यामुळे चोरीच्या रकमेचा अंदाज येऊ शकला नाही. या घरी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहे. त्या भागातील काही लोकांची चौकशी करण्यात आली आहे. चोरट्याचीही ओळख पटल्याने त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पाटलीपुत्र पोलिस स्टेशनचे डीएसपी दिनेश कुमार पांडे म्हणाले.