संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा

- वैजापूर तालुक्यातील ५८ गावांमध्ये ८६ टँकर

0

संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा

– वैजापूर तालुक्यातील ५८ गावांमध्ये ८६ टँकर

छत्रपती संभाजीनगर : यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांच्या काळ संपला असून ऑगस्ट महिन्यान्यातील दुसरा आठवडा सुरू झाला तरी जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यात काही गावांना कोरड कायम आहे. यामध्ये पैठणमधील ३७ गावांमध्ये ५१ टॅँकर सुरू आहेत. वैजापूर तालुक्यातील ५८ गावांमध्ये ८६, तर गंगापूर तालुक्यातील ४२ गावांमधील नागरिक ८१ टॅँकरद्वारे तहान भागवत आहेत. पैठणकरांच्या उशाला जायकवाडी धरण असताना देखील त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पैठण तालुक्यात पावसाने अद्यापही जोरदार हजेरी लावली नसल्याने ३७ गावांत ५१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जून महिन्यातील एक-दोन पावसानंतर जुलै महिन्यात तरी पाऊस येईल असे वाटत होते. पण ऑगस्टमध्येही दमदार पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी पावस न पडल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा: पैठण तालुक्यात मार्चमध्ये टँकरच्या १७२ खेपा सुरू होत्या. त्यानंतर मागणी वाढतच गेली. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. तर वैजापूर तालुक्यात ५८ गावांना ८६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात मुर पावसामुळे पाणीपातळीत थोडीसी वाढ झाल्याने १९ गावांतील ३० टँकर बंद झाले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात खासगी टँकरने शंभरी पार केली होती. त्यानंतर जून महिनाअखेरपर्यंत ११६ टँकरद्वारे ७७ गावांना पाणीपुरवठा केला. यासाठी ८० विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर जून महिन्यात टँकरची मुदत संपल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता.

३७ गावांमध्ये टॅँकर सुरू

पैठणमधील या गावांत टँकरने पाणीपुरवठा आडूळ (बु), दरेगाव, हर्षी (बु), रांजणी, बल्हाळपूर, पाचोड (बु), कडेठाण, रजापूर, दाभरूळ, एकतुनी, ब्राह्मणगाव, मुरमा, आडूळ (खु), गेवराई बुद्रुक, वडजी, ब्राह्मणगाव तांडा, हर्षी (खु), जामवाडी तांडा, सानपवाडी, थेरगाव, पोरगाव, बोकूड जळगाव, खादगाव, रांजणगाव खुरी, देवगाव, कोळीबोडखा, आंतरवाली खांडी, गेवराई मर्दा, डोणगाव, कुतुबखेडा, टेकडी तांडा, हादगाव, केकत जळगाव, हनुबाचीवाडी, अब्दुलपूर आदी ३७ गावांमध्ये टॅँकर सुरू आहेत.

पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न

पैठण तालुक्यात टँकरची मागणी वाढली असून सध्या ५१ टँकर सुरू आहेत. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत चांगला मोठा पाऊस न झाल्याने टँकर सुरू आहेत, असे पाणीपुरवठा अधिकारी, राजेश कांबळे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.