उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार

मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना इशारा

0

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार

मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना इशारा

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात एल्गार पुरकत २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार असल्याचा निर्धार केला. राज्य सरकारला २८ सप्टेंबरपर्यंत अल्टीमेट देत ही आरपारची लढाई आहे. यावेळी फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी १ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपल्याला मागे हटून चालणार नाही. आपल्याला या सरकारला वठणीवर आणावेच लागेल. आपण सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

यावेळी जरांगे म्हणाले, आपल्या जातीचे कल्याण केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुंबईला गेल्याने काही होणार नाही. गरज पडली तर आपण तिकडेही जावू. आपण या निवडणुकीत त्यांचे ११३ आमदार पाडू म्हणजे पाडूच. ही आरपारची लढाई आहे. जे होईल ते होईल. मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरेन. सर्वच जिल्हे व तालुके पिंजून काढीन. सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. फडणवीसांना मराठ्यांची माया आहे की नाही हे आपण पाहू. आणि या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धडा शिकवणार.

उपोषण न करण्याची विनंती

यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी मनोज जरांगे यांना उपोषण न करण्याची विनंती केली. त्यांनी त्यांना हातही जोडले. पण मनोज जरांगे आपल्या घोषणेवर ठाम होते. आता काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. आपण सर्वजण उपोषण करून या सरकारला ताळ्यावर आणू, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.